Clcik to enlarge

नमस्कार मंडळी,

आपणा सर्वांना दसरा-दिवाळीच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा!

नवरात्र सुरु झालं की आपल्याला दिवाळीचे वेध लागतात. भारतात तर बाजारपेठ नुसती रंगीबेरंगी आकाशदिव्यानी भरून जाते.

माझ्या लहानपणी सहामाही परीक्षा संपली की घरी फराळ बनवायचा… चकल्या, कडबोळी, अनारसे, चिवडा, लाडू, शेव, शंकरपाळी असे सर्व पदार्थ साग्रसंगीत करायचे. फटाके आणायचे… फुलबाज्या, भुईनळे, सुदर्शनचक्र, भुईचक्र, बाण, लवंगी फटाके, चमन चिडी आणि सुतळी बॉम्ब अशी आम्ही यादी करायचो. भेटकार्ड बनवायची, दगड-माती आणून किल्ला बनवायचा, किल्ल्यावर ठेवण्यासाठी मावळे, रांगोळीसाठी रंग, पणत्या…. या सगळ्याची एक वेगळीच मजा असायची!

अमेरिकेत आल्यावर प्रथम इथे मिळणाऱ्या गोष्टीतून फराळाचे जिन्नस बनवायला नव्याने शिकले. आकाश कंदील, पणत्या बनवल्या.

मग महाराष्ट्र मंडळात रांगोळीचे गालिचे, फुलांच्या रांगोळ्या, धान्याच्या रांगोळ्या असे विविध प्रकार करायला मिळाले याचा विशेष आनंद वाटतो. आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो, तरी तिथे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्यातून आपली कला साकारायला शिकतो; आणि त्यातून मिळणार आनंद काही वेगळाच असतो नाही का…?

म्हणता म्हणता मंडळाचा 2019 मधला हा अठरावा आणि शेवटचा कार्यक्रम…! “रसिका तुझ्याचसाठी” या मालिकेचे आपण ३ वेगळे आणि हटके कार्यक्रम सादर केले. स्पोर्ट्सचे २ प्रोग्रॅम्स, मुलांसाठी मुव्ही नाईट, फोर्ड फॅक्टरी टूर आणि “आरोग्यम् धनसंपदा” (Health is wealth) ही नवीन मालिका आपण यावर्षी चालू केली; याच्या अंतर्गत योगाथॉन, डॉ. दीक्षित यांचे “Effortless Weight Loss and diabetes prevention” यावर lecture, ५ K वॉकथॉन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले होते. त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिलात; त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

यंदा आपण कोजागिरीला भारतातून श्री.चारुदत्त आफळे यांचा श्रीकृष्ण कीर्तन आणि संगीत नाट्य-छटा असा अत्यंत वेगळा कार्यक्रम केला होता. त्यात मत्स्यगंधा, संगीत स्वरसम्राज्ञी, कान्होपात्रा असे वेगवेगळे भाव असलेले नाट्यप्रवेश सादर केले गेले, ते डेट्रोईटच्या चोखंदळ प्रेक्षकांना खूपच भावले. त्याबरोबरच अनुप बापट आणि शाश्वती किणीकर यांचा संगीत सौभद्र यातील नाट्यप्रवेश आपण सादर केला, तोही प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेला.

यंदाच्या दिवाळीच्या कार्यक्रमात नाटकवेड्या डेट्रोइटकरांसाठी आपण खास मेजवानी घेऊन येत आहोत; श्री.भरत जाधव यांचे अत्यंत गाजलेले नाटक “पुन्हा सही रे सही”....! याचा सेट उभारण्याचे काम आपले सर्व पडद्यामागील कलाकार अतिशय उत्साहाने करीत आहेत. याशिवाय नेहेमीचे आकर्षण दिवाळी फराळ भारतातून खास मागवला आहे; आणि जेवणाचा मेनू पण अगदी हटके ठरवला आहे. यावर्षी आपण रांगोळी आणि किल्ला करायला सर्वांना आवाहन केले होते. याचे प्रदर्शन हॉलमध्ये असेल, तरी आपण त्याला भेट अवश्य द्या. आज हे शेवटचे अध्यक्षीय लिहिताना माझ्या मनात मिश्र भावना दाटून आल्या आहेत.

गेल्या दिवाळीत मी मंडळाच्या अध्यक्ष-पदाचा स्वीकार केला तेव्हापासून आपले नेहेमीचे ६ कार्यक्रम आणि त्याशिवाय काहीतरी नवीन आणि विधायक देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. आपल्या लोकांना उपयुक्त, सांस्कृतिक, मनोरंजनपर, अध्यात्मिक, प्रबोधनपर, आरोग्य-विषयक, शास्त्रीय, volunteering असे विविध कार्यक्रम आपण केले. हे आपल्या सर्वांना आवडले असतील अशी मी आशा करते. खूप लोकांनी मला फोन, ई-मेल, प्रत्यक्ष भेटीत मिठी मारून, शब्दांत जो काही उदंड प्रतिसाद आणि प्रेम दिलंत आणि आपल्या मंडळाच्या लोकांची सेवा करायची संधी मला दिलीत त्याबद्दल मी आपली सर्वांची अत्यंत ऋणी आहे आणि ज्या कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कामाला अक्षरशः वाहून घेतले, त्यांच्या मदती शिवाय इतक्या संख्येने कार्यक्रम यशस्वी करणे अशक्य होते त्या सर्वांचे आभार मानण्यास माझे शब्द अपुरे आहेत; त्यामुळे त्यांच्या ऋणात राहणेच मी पसंत करेन आणि अशीच साथ आपण येणाऱ्या नवीन अध्यक्ष आणि कमिटीला द्याल अशी आशा व्यक्त करते…! विविध कार्यक्रमांची स्वप्नं पाहताना, माझ्यावर विश्वास ठेवून त्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी बळ देण्याचं काम; आपली बोर्ड ऑफ ट्रस्टीज, सर्व देणगीदार आणि जाहिरातदार यांनी मोलाची साथ दिली त्यांचीही मी शतशः ऋणी आहे.

आपली विश्वासू

सौ. भारती मेहेंदळे,
अध्यक्ष महाराष्ट्र मंडळ, डेट्रॉईट् २०१९
संपर्क: ७३४-६७४-३६८७, bharati.mehendale@mmdet.org


Lakeshore Global
Dhake Industries
JayaTravels
Heritage Insurance
RN Management Consulting LLC

Community Links
ILA
ILA
MaiFamily
Miindia
If you want to subscribe for MMD mass email, send email to mmofdetroit@mmdet.org with subject "Subscribe"
To unsubscribe from this group and stop receiving emails send an email to mmofdetroit@mmdet.org with subject "Unsubscribe"
© Maharashtra Mandal of Detroit. Send your feedback to admin@mmdet.org