Clcik to enlarge

दिवाळी २०१९ - महाराष्ट्र मंडळ डिट्रॉइट

MMD चा दिवाळी धूमधडाका फार म्हणजे फारच जबरदस्त होता. अबबबबब ..... केवढ्या गोष्टी होत्या कार्यक्रमात. भरत जाधवांचं लय झकास नाटक होतं. चिकन पासून उंधियो पर्यंत जेवायच्या मेनूची लांबलचक यादी होती. दिवाळीचा फराळ होता. चहा होता. किल्ले होते. सॉलिड रांगोळी होती. लाल गालिच्याच्या पार्श्वभूमीवर फोटो काढायला संधी होती. अफलातून कंदील होते आणि सर्वात भारी म्हणजे सगळ्या बायकांसाठी मोगऱ्याचे गजरे सुध्दा होते. सगळे जण चकाचक नटले होते, हसत होते, लाजत होते, मोठ्याने गप्पा मारत होते, धावणाऱ्या मुलांवर ओरडत होते. नुसती धमाल!!

आता तुम्हीच सांगा, दिवाळी दिवाळी म्हणजे आणखी काय पाहिजे?

सविस्तरंच बोलायचं झालं तर कार्यक्रमाची सुरुवात जेवणापासून झाली. डायरेक्ट सचिन तेंडुलकरच ओपनिंगला आल्यासारखी. उंधियो, पनीर मसाला, चिकन, बटाटेवडा, गोबी मंचुरियन, गाजर हलवा, आईस क्रीम, पुलाव आणि पोळ्या ह्या मेनूला काही अर्थ आहे का? केवढ्या गोष्टी? पण कोणालाही जेवताना "पुढे नाटकात झोप आली तर?" असा प्रश्न पडताना दिसत नव्हता. सगळेजण जोरात चेपत होते. धोनीने शेवटपर्यंत टिकून एक छक्का मारावा तसा नव्या नवलाईचा चमचमीत फराळ नाटकानंतर होताच.

आपलं भाग्य असं की "पुन्हा सही रे सही" हे नाटक असल्याने झोपायचा चान्सच नव्हता. एक मजा सांगतो. माझ्या मुलांनी आणि भाचे मंडळींनी हे नाटक २००४ साली बघितलं होतं. तेंव्हापासून एकत्र भेटले की "अण्णाण्णाण्णा जेवायला जेवायला..." असं आकाशाकडे बघत आणि हात तोंडाकडे नेत ते मोठ्याने अजूनही ओरडतात. तीच पद्धत MMD मध्ये २०२० मध्ये रुजणार असं दिसतंय. हसून हसून पोट दुखलं. डोळ्यातून घळाघळा पाणी आलं. ९०० प्रेक्षकांनी अख्ख हाऊसफुल सभागृह डोक्यावर घेतलं. फुल टू धमाल आली. ज्यांनी नाटक बघितलं नाही त्यांना अगदी मनापासून "टुकटुक". जाऊ दे. आता पुढच्या वर्षीची मेम्बरशिप पट्कन घेऊन टाका आणि हसायला परत तयार व्हा. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, BOT, टीम सगळे परत २०२० साठी तयार आहेत, आणि तुमचं ह्या टीम मध्ये स्वागत करायला उत्सुक आहेत.

पण माझ्यासाठी फक्त भरत जाधव व त्यांचे सहकारी ह्या कार्यक्रमाचे हिरो नव्हते, तर हिरो होते सगळं काम करणारे! किती गोष्टी सांगू!! भरत जाधव यांना दोन सेकंदात एका दरवाज्यातून दुसऱ्या दरवाज्यात "दिसवणे" ही काही खायची गोष्ट नव्हे. ते भक्कम स्टेज बांधायला १५-२० हिरो मंडळी दोन आठवडे वेड्यासारखं काम करत होती. जेवण बनवलं असेल बाहेरच्या माणसांनी, पण मी आत्ता ह्या क्षणी कॅफेटेरिया मधली कमीतकमी ५० कामांची यादी बनवू शकतो की जी आपल्या हिरो लोकांनी अगदी सहजपणे केली. त्याशिवाय रजिस्ट्रेशन सांभाळलं, डेकोरेशन केलं, सभागृहात आवाज आणि प्रकाश सेट केला, चहा बनवला, राष्ट्रगीतं म्हंटली, फराळ डब्यात भरला, दारांना तोरणं लावली, स्नेहबंध मासिक छापलं, पाण्याचे जग भरले. पुलंच्या नारायणासारखे हे हिरो खिशात काहीही घेऊन लढत होते. वाढायचे डाव, खिळे, चिटकवायची टेप, कात्र्या, मेणबत्त्या तुम्ही म्हणाल त्या गोष्टी ह्यांच्याकडे सापडल्या. त्यामुळे सगळं कसं झकास झालं!

आता हे वाचून झालं असेल तर एक काम करा. एक सेकंद तरी उभे राहा आणि ह्या डेट्रोईटच्या हिरोंना एक सलाम मारा !!!

नितीन अंतुरकर 


Clcik to enlarge

MMD कोजागिरी २०१९ - Review 1

अंधाराला न जुमानता, अमावस्येचे सगळे नियम तोडून चंद्र ‘को जागरी’ विचारत पृथ्वीतलावर अवतरला आणि चारूदत्त आफळे व गौरी पाटील यांचं गायन ऐकत सूरमय झाला. आजूबाजूला मी नजर टाकते तर सभागृहातले सर्व सूर चंद्र झाले होते!

किर्तनकारापुढे २ आव्हानं असतात, समोरच्या जमावाचं मनोरंजन करायचं आणि प्रबोधनही. पुराणातल्या कथेचा दाखला देत भक्तिसंप्रदायाचं भांडार खुले करायचे, त्यासाठी मिठ्ठास वाणी आणि विनोदबुद्धी दोन्हीची सांगड घालावी लागते. सध्याच्या काळात तिसरं आव्हान म्हणजे आजच्या पिढीला ते कालबाह्य झालं आहे असं न वाटू देणं! चारुदत्त आफळे “आफळेबुवा” यांनी ही आव्हानं पेलली, झेलली इतकंच काय तर पुढील पिढीला किर्तनाची ओळख असो वा नसो गोडी वाटावी असं छान वातावरण निर्माण केलं. पूर्वरंगातल्या किर्तनाला उत्तररंगात जोड मिळाली ती सुश्राव्य संगीताची.

निवेक, संगीत नाटकांचा नायक आणि पेटीवादक या तिन्ही भूमिका - स्टेजवर कुठेही धावपळ न करता - बुवांनी ज्या पद्धतीने बजावल्या त्याला तोड नाही. मूळचे कीर्तनकार असल्याने त्यांनी निवेदनात निव्वळ नाटकांची आकडेवारी न देता प्रेक्षकांना संगीत नाटकांचा इतिहास (थोडक्यात सांगून) जाणते केले.

गौरीताईंच्या गुणांची स्तुती करावी तितकी थोडी आहे, त्यांची पेटीवर लीलया फिरणारी बोटं झांजेवर जोरात व तालात चालत होती. गाणं तर हाय् हाय्! मैनेचा शृंगारिक लाडीकपणा हालचालीतून जितका जाणवला तितकाच - नव्हे अधिकच - गातांना घेतलेल्या हरकतीतून जाणवला. तीच गायिका व तिचेच सूर पण संत कान्होपात्रेची शालीनता, सत्यवतीचा आत्मविश्वास आणि स्वरसम्राज्ञीमधली ‘गावरान’ मैना ह्या सर्व नायिका गाण्यातून ती साकार करू शकली.

रंगमंचावर अनेक रंग उधळले होते, तरीही मंच रंगबंबाळ झाला नाही, वाक्यावाक्यातून शब्दांची फेक व रेलचेल होती, तरीही संवाद शब्दबंबाळ झाले नाहीत…. आम्ही मात्र घायाळ झालो ते सुरांनी. “श्री तायवाडे यांनी तबल्यावर उत्तम साथ केली” हे विधान फारच मोघम व लेचंपेचं वाटेल. त्यांचा तबला नाटकाचा एक अविभाज्य घटक होता.

डेट्राईटकरांना हा कार्यक्रम म्हणजे एक खास पर्वणी होती. अनुप बापट, शाश्वती किणीकर, ऊमा कानडे, पेटीवर अनिल अर्काटकर, व तबल्यावर रामनाथ पै हे आमचे स्थानिक कलाकारही इतके समर्थ आहेत की उत्तररंगात गुंफलेल्या नाट्यपुष्पांमध्ये त्यांचा ‘सौभद्र’ नाटकातील संगीतयुक्त प्रवेश तितकाच डौलदार दिसला. सुरूवातीला सारंग भिडे व विधी कामत यांनी सादर केलेली दोन्ही राष्ट्रगीतेही इतकी सुरेल होती की पुढील कार्यक्रमाची (आणि संगीत नाटकाच्या प्रथेनुसार) नांदीच झाली.

कृष्णाला पूर्णावतार म्हणतात, तर त्याला स्मरून झालेलं कालचं कीर्तन एक पूर्णाविष्कार म्हणता येईल. इतका अप्रतिम कार्यक्रम दिल्याबद्दल आभार तरी कुणाचे मानायचे? आद्य कीर्तनकार नारद, आद्य मराठी कीर्तनकार नामदेव, संत एकनाथ …. डेट्राॅईट मराठी मंडळाचे खंदे स्वयंसेवक - ह्यासर्वांच्या मदतीने- चहापान करूनही - वेळीच कार्यक्रम सुरू करणारे program managers (योजकस्तत्र दुर्लभ:...), रंगमंचावरच्या मागच्या पडद्यावर मोजकीच व यथोचित चित्र प्रक्षेपित करणारे ‘पडद्यामागचे’ कलाकार, प्रकाश, ध्वनी योजना करायला झटणारे कार्यकर्ते , आणि कार्यक्रम संपून प्रेक्षक बाहेर येताच क्षणी चविष्ट खाऊचा डबा हातावर ठेवणारे स्वयंसेवक ...…आम्ही समस्त प्रेक्षक या सगळ्यांचे शतश: ऋणी आहोत!

पुंडलीक वरदा हारी विठ्ठल!

​ज्योत्स्ना दिवाडकर


Clcik to enlarge

MMD कोजागिरी २०१९ - Review 2

"हे सुरांनो चंद्र व्हा" कोजागिरी २०१९ - महाराष्ट्र मंडळ डिट्रॉइट

काल कोजागिरीच्या निमित्ताने झालेल्या खुमासदार कार्यक्रमाची चव अजून मनावर रेंगाळत राहिली आहे. या 'हटके' कार्यक्रमाची निवड केल्याबद्दल भरती मेहेंदळे यांचं खूप कौतुक आणि त्यांना साथ दिल्याबद्दल म. मं. डि. समितीच्या सभासदांचे मनापासून आभार.

पूर्णावतार श्रीकृष्णाच्या बहुरूपी गुणांपैकी ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, औदार्य, यश, आणि श्री या सहा गुणांचं हे आख्यान.

मार्मिक, खुसखुशीत निवेदन, भक्ती, संगीत, नाट्य, मनोरंजन आणि प्रबोधन - कीर्तन या फॉर्मच्या सहाही अंगांनी चढत्या क्रमाने फुलवत नेलं आफळेबुवांनी. दृष्टांत अलंकार हा कीर्तनकाराचा हुकुमी एक्का. आफळेबुवांनी प्रत्येक बाजी जिंकली. दुसऱ्या भागांत समर्थ मुद्राभिनय आणि सुंदर, लवचिक आवाज घेऊन श्रीमती गौरी पाटील यांनी कालच्या कोजागिरीला खरोखर 'चार चांद' लावले. मी भारावून जाऊन एक-दोनदा तर मनांतल्या मनांत त्यांची दृष्ट सुद्धा काढली.

दोन खुर्च्या, दोनच वाद्य एवढी तुटपूंजी सामग्री घेऊन दोन कसबी कलाकार काय जादू करून दाखवतात ? ज्या परंपरेच्या खांद्यावर ते भक्कम पणे उभे आहेत , त्याचा हा सत्कार आहे. मोठा दिलासा.

किर्तनापेक्षा कौतुक लांब नको म्हणून थांबते.

शुभदा शास्त्री


Clcik to enlarge

MMD गणेशोत्सव २०१९ - सुखकर्ता

गणेशोत्सव हा MMD च्या वर्षातला एक महत्वाचा, मोठा कार्यक्रम असतो आणि लहान मुलांच्या सहभागामुळे तो अजूनच विशेष ठरतो. गेल्या रविवारी, MMD २०१९ चा गणेशोत्सव अगदी वाजत गाजत पार पडला. ५ वर्षांच्या चिमुरड्यांपासून ते १७ वर्षांच्या "टिनेजर्स" मुला-मुलींनी त्यांच्या आई-बाबांची, भारतातून आलेल्या आजी-आजोबांची आणि इतर प्रेक्षकांची मनं जिंकली!

लहान मुलं आणि गणपती बाप्पा यांचं एक खास नातं असतं. लहानपणी सगळ्या बाप्पांमध्ये गणपती बाप्पाच आपला सगळ्यात लाडका असतो, नाही का! गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्तीच्या गोजिऱ्या रूपात जितकी निरागसता असते तितकीच निरागसता लहान मुलांमध्येही असते. कदाचित त्यामुळेच असेल, पण काही वर्षांपूर्वी MMD ने ठरवलं की गणेशोत्सवाचा कार्यक्रम हा लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून करायचा! तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी लहान मुलांना घेऊन काहीतरी वेगळं करायचा आपला प्रयत्न असतो. गणेशोत्सवाचा कार्यक्रम अधिकाधिक चांगला करायचा आपला प्रयत्न असतो.

या वर्षी आपण लहान मुलांना गणपतीच्या पूजेला बसवलं होतं. बाप्पाला ओवाळून त्याची आरती म्हणताना मुलं-मुली तल्लीन झाली होती. मग पुरण पोळीच्या सुग्रास भोजनानंतर नाच, गाणी, गायन आणि वादन यांचे तब्बल १९ कार्यक्रम झाले. लहान मुलांचा उत्साह आणि त्यांनी सादर केलेली कला पाहण्याजोगी होती. कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही मुलांनीच केलं होतं! यावर्षी पहिल्यांदाच लहान मुलांच्या कार्यक्रमासाठी मागच्या पडद्यावर व्हिज्युअल्सचा कल्पकतेने वापर केला गेला होता. त्याने कार्यक्रमांना अजून रंगत आणली. आत सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना बाहेर काही मुलांनी क्ले चे सुरेख गणपती बनवले होते. ब्लॉऊज -पिसेस वापरून केलेली गणपतीची रांगोळी ही यावेळीची अजून एक खासियत होती.

शेवटी ढोल-ताशाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अगदी व्यावसायिक पथक वाटेल इतक्या कुशलतेने आपल्या MMD च्या पथकाने शंख फुंकून, ढोल-ताशा-झांज वाजवून, लेझीम खेळून, ध्वज नाचवून आणि लोकांना नाचायला भाग पाडून उपस्थितांचे डोळे आणि कान तृप्त केले! ढोल-ताशांच्या निनादात सभोवतालचं वातावरण मंगलमय करायची ताकद असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

गणेशोत्सवाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरला. शीतल सोनार आणि सोना पाटील या दोघी याच्या 'प्रोग्रॅम मॅनेजर्स' होत्या. MMD च्या खंद्या कार्यकर्त्यांची त्यांना मोलाची साथ लाभली. ९५० हून अधिक लोकांच्या उपस्थितीमुळे सिहोम हायस्कुल त्या दिवसाकरता अगदी मराठमोळं होऊन गेलं होतं! बऱ्याचश्या पुरुषांनी झब्बा-सलवार असा पेहेराव केला होता, तर बऱ्याचश्या बायका नऊवारी साडी नेसून आणि नथ घालून मिरवत होत्या. दिवस कसा संपला कळलंच नाही. बाप्पाला एकदा शेवटचा नमस्कार करून लोक आपापल्या घरी जायला निघाले. त्या दिवशी डेट्रॉईटवर त्या बुद्धिदेवत्याची कृपादृष्टी जरा जास्तच होती असं मला क्षणभर वाटून गेलं...Clcik to enlarge

आरोग्यमं धनसंपदा - Effortless weightloss by Dr. Jagannth Dixit

डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचं 'Effortless Weight Loss and Diabetes Management' वरचं व्याख्यान शुक्रवारी महाराष्ट्र मंडळ ऑफ डेट्रॉईटने (MMD), इंडिया लीग ऑफ अमेरिका (ILA) च्या सहकार्याने आयोजित केलं होतं आणि त्याला डेट्रॉईटवासियांनी तुडुंब प्रतिसाद दिला!
डॉ. दीक्षित आणि त्यांचं 'दीक्षित डायट' हे खरं तर आज घराघरांत पोहोचलेलं आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतात आणि इतर देशांतही या 'दीक्षित डायट' ला प्रसिद्धी मिळत आहे. आज डॉ. दीक्षित हे जणू एक सेलिब्रिटीच झाले आहेत आणि म्हणूनच YouTube वर त्यांची सगळी भाषणं उपलब्ध असूनही डॉ. दीक्षितांना भेटायला, त्यांचं बोलणं ऐकायला, त्यांना प्रश्न विचारायला लोकांनी गर्दी केली होती.
"दिवसांतून फक्त २ वेळा जेवा आणि एकदा जेवायला सुरुवात केली की ते जेवण ५५ मिनिटांत संपवा." - दीक्षित डायटचं इतकं साधं सूत्र आहे. पूर्वीच्या काळी आपल्या पूर्वजांच्या आहाराची पद्धत अशीच असायची. आज-काल फास्ट फूडच्या जमान्यात आपण अरबट-चरबट खायला लागलोय, भूक नसेल तेव्हा खायला लागलोय आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर आपण परिणाम करून घेतलाय. दीक्षित डायटचं सूत्र सांगताना डॉ. दीक्षितांनी त्यामागचं शास्त्र अगदी सोप्या शब्दांत सांगितलं. डॉ. दीक्षितांनी अनेक प्रयोग करून या विषयावर शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. आज जगभरातल्या हजारो लोकांना दीक्षित डायटचा फायदा होत आहे.
डॉ. दीक्षितांच्या खुमासदार शैलीमुळे २ तास कसे गेले कळलं देखील नाही. प्रसिद्ध माणसाचा साधेपणा लवकर भावतो. डॉ. दीक्षितांच्या बाबतीत अगदी तसंच झालं! 'लठ्ठपणा आणि मधुमेहाला लढा द्यायचा आणि लोकांना फिट बनवायचं' या ध्येयाने डॉ. दीक्षित हे डायट जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचं कार्य करतात. या सगळ्यासाठी ते एक पैसाही घेत नाहीत. आणि म्हणूनच ते एक समाजकार्य आहे. डॉ. दीक्षितांच्या या लढ्यात अनेक स्वयंसेवक सामील आहेत. त्यात अनेक डॉक्टरदेखील आहेत. BMM २०१९ च्या अधिवेशनानंतर डॉ. दीक्षित अमेरीकेत २३ ठिकाणी हे व्याख्यान अगदी विनामूल्य देणार आहेत! या समाजकार्यात खारीचा वाटा उचलावा म्हणून MMD ने सगळ्या मेंबर्स आणि नॉन- मेंबर्ससाठी हा कार्यक्रम अगदी विनामूल्य ठेवला होता. हॉलचं भाडं, स्नॅक्स, प्रवास खर्च आणि इतर आर्थिक भार आपल्या मंडळाने ILA च्या सहकार्याने उचलला.
डॉ. दीक्षितांच्या व्याख्यानानंतर डेट्रॉईटकर चांगलेच प्रेरित झाले आहेत. एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर डायट करताना एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढच्या वर्षभरात सगळे डेट्रॉईटकर मिळून ३०० पाऊंड वजन कमी करू शकले तर आपलं कौतुक सांगायला आपण डॉ. दीक्षितांना परत डेट्रॉईटला बोलवू!
एकंदर डॉ.दीक्षित डेट्रॉईटकरांना खूप आवडले. शेवटी काय, मराठी माणूस 'दीक्षित' आडनाव असलेल्या व्यक्तींच्या प्रेमात असतोच. सुज्ञास अधिक सांगण्याची गरज नाही!

सुशांत खोपकर


Clcik to enlarge

रसिका तुझ्याचसाठी: तू माझा सांगाती

दरवेळेस 'हटके'च प्रोग्रॅम्स द्यायचे; या ध्यासाने प्रेरित झालेल्या 'रसिका'च्या टीमने 'Industrial Design' या जीवक बडवेच्या भौतिक प्रगती विषयक लेक्चर नंतर चक्क 'तू माझा सांगाती' सारख्या अध्यात्मिक प्रगतीच्या विषयावर देवदत्त कुलकर्णी याचं ज्ञानेश्वरीचं निरूपण आयोजलं होतं.
'मदर्स डे' चा दिवस या कार्यक्रमासाठी निवडून, त्यादिवशी ज्ञानेश्वर 'माऊली' यांच्या कार्याचं विवेचन सादर करून टीमने एक वेगळंच औचित्य साधलं होतं.
वीस वर्षांहून अधिक ज्ञानेश्वरीचा अभ्यास असलेल्या आणि त्यावरील व्याख्यानांची सवय असलेल्या देवदत्तने प्रवचनाची सुरुवात गीतेच्या नवव्या अध्यायातील दाखल्यांनी केली.
अनन्याश्र्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||
भगवंताप्रती अनन्यभक्ती व संपूर्ण शरणभाव ठेऊन, आपण केवळ निमित्तमात्र होऊन सर्व कर्म भगवंतास अर्पण करणाऱ्यांस, स्वर्गाच्याही पलीकडे असलेले जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांतून सोडवण्याचे भगवंतांचे वचन.
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आणि त्यांचे अतुलनीय कार्य. रोजच्या जीवनातील अनुभव, भगवदभक्तीत हातून नकळत होणाऱ्या चुका आणि तरीसुद्धा सदैव 'सांगाती' राहून भक्तांना सांभाळून घेण्याचे भगवंतांनी दिलेले वचन या व अशा अनेक विषयांना अतिशय रसाळपणे स्पर्श करत कार्यक्रम चालला होता.
गणितासारख्या विषयांत (जिथे दोन अधिक दोन चारच असतात) डॉक्टर असलेल्या देवदत्त सारखा माणूस जेंव्हा भगवंत, श्रद्धा, अनन्यभक्ती असं व्यावहारिक बेरजा-वजाबाकीच्या पलीकडलं बोलायला लागतो, तेंव्हा त्या शब्दांना निश्चितच वजन येतं.
दीड तासासाठी बेतलेला हा कार्यक्रम दोन तास होऊन गेले तरी चालूच होता; आणि तरीही श्रोते जांभया न देता तन्मयतेने श्रवण करत होते.
हा कार्यक्रम अधिक प्रवाही, अर्थवाही होण्यासाठी ज्ञानेश्वरीच्या काही वेचक ओव्या निवडून, त्याचं सुरेल सादरीकरण मृणालिनी आणि अनिल अर्काटकर यांनी करून कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला
उपस्थित रसिकांसाठी विठोबाच्या बरोबरीने बटाटे-पोहे (मंजिरी जोशी), मोहनथाळ (दीपा इंगळे) आणि चहा-कॉफी अशी पोटोबाचीही सोय, 'रसिका' टीमने चोख ठेवली होती.

संजय मेहेंदळे


Clcik to enlarge

Ping-Pong tournament review

टकॉक, टक, टकॉक, टक, टकॉक, टक.... प्रॅक्टिस सेशनमधे सोहम, रायन, आयन, जो यांच्या रॅलीज चालल्या होत्या....आणि बघणारे लोक पापणीही न लववता विस्फारलेल्या डोळ्यांनी त्यांचा खेळ पाहत होते.....

MMD 2019 च्या टेबल टेनिस टुर्नामेंटसाठी हा खेळ चालला होता. RSVP केलेल्या चाळीस-पंचेचाळीस लोकांपैकी, आयत्या वेळेस न येऊ शकलेले काही लोक वगळले; तरीही चाळीसएक लोक या स्पर्धेसाठी जमले होते. मंडळाचे सभासद नसलेलेसुद्धा काही लोक (पैसे भरून) आवर्जून खेळात सहभागी झाले होते. पूर्वी कधीतरी खेळलेले, नव्याने खेळायला सुरवात केलेले, नेहमी खेळणारे अशा सर्व प्रकारच्या स्पर्धकांमुळे स्पर्धेसाठी 'ड्रॉज' पाडण्याचं काम जय मुंज (प्रोगॅम मॅनेजर) आणि DD (धनंजय देशमुख) यांच्यासाठी थोडं challenging झालं होतं. बेलसरे (सिनिअर), आनंद आणि दीप्ती शारंगपाणी (आनंद तर जयच्या बरोबरीने प्रोग्रॅम मॅनेजर होते), अभय मेहेंदळे यांचा स्पर्धेतला उत्साही सहभाग 'सिनिअर' शब्दाला लाजवणारा असा होता. स्पर्धकांसाठी light snacks म्हणून सामोसे ठेवले होते ; आणि मंडळाच्या परंपरेला अनुसरून चहा अर्थात होताच.

'मदर्स डे' चा दिवस या कार्यक्रमासाठी निवडून, त्यादिवशी ज्ञानेश्वर 'माऊली' यांच्या कार्याचं विवेचन सादर करून टीमने एक वेगळंच औचित्य साधलं होतं.

जुना चॅम्प सचिन बिडकर डेट्रॉईटमधून बाहेर पडल्यामुळे अर्थातच नव्हता, त्याची उणीव जाणवली; तसाच अचानक उद्धभवलेल्या आजारपणामुळे आशिष कोटणीस स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही, त्याचीही! पण सोहमने विजेतेपदाची ट्रॉफी घरी येईलच याची पुरेपूर काळजी घेतली. मराठी वृत्तपत्रांतून येणाऱ्या टिपिकल शीर्षकांच्या भाषेत - 'एकेरी आणि दुहेरी विजेतेपदाचा मुकुट' सोहमने पटकावला. विजेतेपदापर्यंत पोहचू शकले नाहीत तरी सुनील केळकर, सिद्धार्थ सुळे, श्रद्धा कुलकर्णी यांचाही खेळ लक्षवेधी असाच झाला.

जय मुंजने कॅरम टुर्नामेंट इतकंच यशस्वी नियोजन टेबल टेनिस टुर्नामेंटचंही केलं. नियोजित वेळेप्रमाणे एक वाजता सुरु झालेल्या स्पर्धा वेळेत चार वाजता संपल्या. स्पर्धेचे विजेते सोहम कोटणीस (एकेरी विजेता), रायन (एकेरी उपविजेता), सोहम कोटणीस आणि आयन बन्सल (दुहेरी विजेते), रायन आणि जो (दुहेरी उपविजेते) यांना MMD प्रेसिडेंट भारती मेहेंदळे आणि आनंद शारंगपाणी यांनी महाराष्ट्र मंडळाच्या विजेते आणि उपविजेते पदांची स्मृतिचिन्हे भेट दिली.

संजय मेहेंदळे

Clcik to enlarge

Amar Photo Studio review

मराठी लोकांबद्दल (कु)चेष्टेत असं म्हणतात, २ मराठी माणसं एकत्र आली, त्यांनी ३ नाटकं केली, त्यातलं १ स्टेजवर घडलं. अहो पण स्टेजवरचं नाटक कसं दणक्यात झालं बघा! एकदम casually... तरीही खोल!

मला नाटकाविषयी काहीही माहिती नव्हती. जिथे तिथे एका डोळ्याला बोटांचा चष्मा लावलेल्या लोकांचे फोटो पाहून खरंतर वैताग आला होता. पण पडदा उघडला आणि पहिल्या दृश्यातच मी ते सर्व विसरून सरसावून बसले. मोजकं नेपथ्य, रंगमंचावर सामानाची गर्दी नाही पण तरीही जबरदस्त वातावरण निर्मिती! आणि मग संवादाची फेक अशी सुरु झाली की टेबलटेनिसचा (किंवा बॅडमिन्टन) रंगलेला सामना बघावा तसं, बोल वाक्य की हाणला टोला! प्रेक्षकांमधून सतत हास्याचे फवारे उडत होते. विनोदी नाटक सादर करणं कठीण असतं, थिल्लर किंवा उथळ होण्याचा धोका असतो; APS मंडळींनी तो सहजी टाळला. म्हंटलं तर हसतखेळत जीवन सकारात्मक होण्याचा एक महामंत्र दिला पण कुठेही धडेबाजी वाटली नाही.

किती बोलायचं याचबरोबर किती बोलायचं नाही हे भान ह्या पात्रांनी ठेवल्याने आम्ही शब्दबंबाळ तर झालो नाहीच, शिवाय मोजकीच पात्रं असल्याने 'पात्रबंबाळ'देखील नाही. कविता, नाच गाणी हे सर्व वृत्त -छंद- ताल - ठेका जमवून बसलं!

आपल्या identity चा प्रवास सरळसोट कधीच होत नाही, गाडी कधी आडनिडी वाट धरते, तर कधी नागमोडी वळण घेते, तर कधी अडकते, मग reverse घ्यावी लागते.... उज्ज्वल भविष्यकाळ होण्यासाठी भूतकाळातील काही अप्रिय गोष्टींना तोंड द्यावं लागतं, मग तो भूतकाळ आपला असू दे किंवा .... ते नाही सांगत आता, बघाच तुम्ही नाटक.

नाट्यगृहात वय वर्षे १२ ते ८२ वयाचे तब्बल ५२० (अमेरिकेतील उच्चांक!) प्रेक्षक होते. या सर्वांना खुश करणारं नाटक लिहिणं अवघड आहे, बुफ्फे असला तर पोट भरतं पण मेजवानीचं समाधान मिळत नाही... तरीही कथानकात सर्वांना आवडेल, भावेल आणि खूण पटेल असं काहीतरी विशेष होतं. नाटकातल्या विनोदाची धाटणीही वेगळी होती, शाब्दिक कोट्या, वेडेवाकडे (फाजील!) अंगविक्षेप यांच्याशिवाय संवाद विनोदी होऊ शकतो; हे इतक्या सहजी जाणवलं. ‘The play’s the thing’ हे शेक्सपिअर म्हणाला खरं पण अमर फोटो स्टुडिओ नाटक पाहता तर 'The timing’s the thing’ म्हणता! भूमिका वठवणे म्हणजे 'परकायाप्रवेश' करावा लागतो पण तो किती प्रकारे करायचा आणि प्रवेश करून बाहेर कसं यायचं याचं APS अत्यंत मार्मिक उदाहरण आहे.

फोटो स्टुडिओबरोबर कलाकारांचही नाव ‘अमर’ होईल असं नाटक होतं. नाटक यशस्वी करणं म्हणजे जगन्नाथाचा रथ ओढणं! आणि हा रथ सर्वांनी ‘जोर लगाके’ ओढला, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, आणि नाटककार… इतकंच काय तर रंगमंचामागचे कलाकार म्हणजे आमची logistics team यांनी देखील .

आपण मराठी माणसं जितकी नाटकप्रेमी तितकीच चहावेडी, सर्व प्रेक्षकांच्या गरजा लक्षात घेऊन मध्यंतरात वेळीच चहा पुरवणाऱ्या ‘चहाचमू’चे अभिनंदन! सोबत बटाटेवडे होतेच, आता सुख सुख म्हणजे तरी आणखी काय असतं?

​ज्योत्स्ना दिवाडकर

Lakeshore Global
Dhake Industries
JayaTravels
Heritage Insurance
Kashmira Realtor

Community Links
ILA
ILA
MaiFamily
Miindia
If you want to subscribe for MMD mass email, send email to mmofdetroit@mmdet.org with subject "Subscribe"
To unsubscribe from this group and stop receiving emails send an email to mmofdetroit@mmdet.org with subject "Unsubscribe"
© Maharashtra Mandal of Detroit. Send your feedback to admin@mmdet.org